आ.सुधीर मुनगंटीवारांच्या बाउंसर ने चंद्रपूरच्या राजकीय पिचवर काँग्रेसमध्ये उभी फुट…

0
443

 

कॉलेज कट्टा न्यूज
चंद्रपूर: (नरेंद्र सोनारकर) काँग्रेसमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर आणि ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्यातील अंतर्गत वाद सध्या शिगेला पोहोचला आहे जानेवारी 2026 मध्ये झालेल्या चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने मोठे यश मिळवल्यानंतर सत्तास्थापनेच्या प्रक्रियेवरून हा संघर्ष उफाळून आला आहे.

काँग्रेसच्या दोन गटातील नेते आमने-सामने
नगरसेवकांच्या पळवापळवीचे आरोप लावत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल करत काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना जबरदस्तीने “उचलून” नेल्याचा आरोप केला आहे.पक्षाच्या नगरसेवकांमध्ये अशी गटबाजी निर्माण करण्याची काय गरज होती, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.यावर प्रत्युत्तर देतांना वडेट्टीवारांनी हे आरोप फेटाळून लावत स्पष्ट केले की, कोणतेही नगरसेवक जबरदस्तीने नेलेले नाहीत, तर ते स्वखुशीने त्यांच्याकडे आले आहेत. “कुणीही नेता पक्षाचा मालक नसतो” असा टोलाही त्यांनी धानोरकरांना लगावला आहे.दरम्यान आरोप प्रत्यारोपच्या या फैरी एवढ्या धारदार आहेत की,हा अंतर्गत वाद वणव्या सारख्या सामान्य जनतेतही पसरतो आहे…

काँग्रेसच्या दोन वेगळ्या गटाचा राजकीय लाभ कुणाला..?
चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले असले तरी स्पष्ट बहुमत नसल्याने तेही अधांतरी आहेत.तर वर्चस्वाच्या या लढाईत दोन गट एकत्र येऊन सत्तास्थापने साठी संयुक्त प्रयत्न करतील याची आशा मावळल्याने यावर पक्षश्रेष्ठी काय तोडगा काढणार,यावर काँग्रेसचे सत्तांतरण अवलंबून आहे.

आ.सुधीर मुनगंटीवारांचा बाउंसर आणी काँग्रेस मध्ये खळबळ
30 नगर सेवक असलेल्या काँग्रेस मध्ये उभी फुट दिसताच “काँग्रेसचा एक गट सोबत असल्याचा दावा करत आ.सुधीर मुनगंटीवार यांनी टाकलेला बाउन्सर काँग्रेसच्या दोन्ही गटात खळबळ उडवून देणारा ठरला आहे.23 चे संख्याबळ घेऊन सत्तेवर दावा करत मुनगंटीवार यांनी टाकलेला बाउंसर राजकारणातील परिपक्व खेळी असल्याचे जाणकारांचे मत असून,काँग्रेस चा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने ते या खेळीत यशस्वी ठरल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.दरम्यान चंद्रपूर मनपा ची सत्ता संख्याबळावर अवलंबून न राहता राजकीय गणितांच्या जुळवा जुळविवर अवलंबून राहणार असल्याचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहेत…

काँग्रेसचे नगर सेवक फुटून भाजपाच्या गोटात जातील का..?
या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी असले तरी मुनगंटीवार यांच्या दाव्यात किती दम आहे? आणी खरच आ.विजय वड्डेटीवार यांच्या संपर्कातील नगरसेवक भाजपच्या गळाला लागतील का? हाच मोठा प्रश्न आहे.असे झालेच तर वाडेट्टीवरांची प्रतिमा डागळेल,त्यामुळे असला कुठला राजकीय भूकंप येईल,असे राजकीय विश्लेषकांना वाटत नाही.

शिवसेना (उबाठा) ची तटस्थ भूमिकेचे काय होईल?
उबाठा 6 आणी मित्रपक्ष वंचित चे दोन असे अशी 8 संख्याबळ असलेल्या शिवसेनेने तटस्ट भूमिका घेत महापौर पद देईल त्याला पाठींबा अशी घोषणा केली असली तरी राज्य स्तरावर उबाठा काँग्रेसची युती असल्याने उपमहापौर पदावर समाधान करत काँग्रेसला पाठींबा देण्याचा आदेश मातोश्री वरून येऊ शकतो.मात्र काँग्रेस ची चव्हाट्यावर आलेली गटबाजी,आरोप,प्रत्यारोप यांचे मनोमिलन झाल्यास काँग्रेस सत्ता स्थापन करू शकते.अन्यथा मुनगंटीवारांचा बाउंसर यशस्वी ठरल्यास अनैसर्गिक प्रक्रियेतून भाजपचा महापौर विराजित होऊ शकतो असेही जाणकारांचे मत आहे.

काँग्रेस पाक्षश्रेष्ठी ची भूमिका महत्वाची-
खासदार धानोरकर,आ.विजय वड्डेटीवार यांचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून,
प्रतिभा धानोरकर यांनी वडेट्टीवारांना त्यांच्या ब्रह्मपुरी मतदारसंघापुरते मर्यादित राहण्याचा आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात ढवळाढवळ न करण्याचा इशारा देत या प्रकरणात लक्ष न दिल्यास राजीनामा देण्याची भूमिका घेतली आहे.या वादामुळे काँग्रेसमध्ये दोन गट पडले असून, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नागपूरमध्ये तातडीची बैठक बोलावली आहे.या बैठकीत दोन्ही गटाचे समाधान झाल्यासच मनपात काँग्रेसची सत्ता येऊ शकते.अन्यथा मुनगंटीवारांचा बाउंसर या राजकारणी पिच वर अलौकिक कामगिरी करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here