सर्वव्यापी डॉ बाबासाहेब आंबेडकर..

0
86

*विशेष संपादकीय…*
एड.योगिता प्रकाश रायपुरे

वर्णव्यवस्थेची उतंरडीत माणसाच्या बुध्दीमत्तेपेक्षा कोणत्या जातीत जन्माला आला याला महत्व देवून त्याला मरेपर्यत त्याच व्यवस्थेत ठेवणारी शोषणकारी व्यवस्था अनुभवलेले डॉ बाबासाहेब  आंबेडकर हे त्यांच्या अभ्यासु व कुशाग्र बुध्दीमत्ते करीता प्रसिद्ध असलेले ३२ डिग्री ९ भाषा येत असलेले प्रकांड विद्वान.  ज्यांनी अर्थशास्त्र, इतिहास, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, शिक्षणक्षेत्र, विधीक्षेत्र, राजकारण, कामगार, मजूर व शोषित समाजाचे उत्थान कर्ते अश्या  वेगवेगळ्या क्षेत्रात लक्षवेधी कार्य केले.
९ मे १९१३ ला “भारतातील जाती, त्याची उत्पत्ती व प्रचार” हे कोलंबिया विद्यापीठात मानववंशशास्त्र मंडळाच्या अभ्यासमंडळा समोर वाचलेला निबंध जो पुस्तक रूपात प्रकाशित झाला ते वयाच्या २३ व्या वर्षी लिहलेला. यानंतर  The promblm of rupees… हे वित्तीय चलनावर अर्थशास्त्र संबधी लिहीलेला शोधनिबंध ज्याचा आधार घेवून भारतात रिजर्व बैक आफ इंडिया ची स्थापना करण्यात आली. शुद्र पुर्वी कोण होते, जातीप्रथेचे निर्मुलन, बुद्ध आणि कार्ल मार्क्स, मुक्ति कोण पथे, Thoughts on Pakistan, Riddles of Rama & Krishna, क्रांती प्रतिक्रांती, अश्या अनेक सामाजिक, राजकीय व धार्मिक विचारावर सखोल अभ्यास व विवेचन असलेले त्यांचे विचार व त्यावरील पुस्तके लिहितांनाच समाजिक विषमतेला गुलामी मानसिकतेला नष्ट करण्यासाठी शिक्षणाला प्रथम प्राधान्य देणारे व शिका संघटित व्हा ,संघर्षरत राहा हा विचार सर्व दुर्बल समाजासमोर  प्रस्थापित करून त्यांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकिय व धार्मिक अश्या वेगवेगळ्या क्षेत्रात विज्ञानवादी दृष्टीकोनासह आरूढ होण्यास प्रोत्साहित करणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर.
भारताच्या संविधान सभेत मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या संविधानाची निर्मिती केली. या माध्यमातून भारतातील विषमवादी व्यवस्थेला समूळ नष्ट करत  स्वातंत्र्य, समता, बंधुता, समान संधी, न्याय , हक्क व अधिकार प्रदान करत या भारतातील जनतेला अमुल्य असे जगातील सर्वात मोठे संविधान बहाल केले. हजारो वर्षांपासून वंचित असलेल्या समाजाला एक नवी दिशा व आकाश दिले.
त्यांच्या विचारांचा वारसा हा मानवाला माणुस म्हणून जगण्याचा अधिकाराची जाणीव निर्माण करतो.
स्त्री ही धार्मिक व समाजीक व्यवस्थेचा केंद्रबिंदू आणि तिच्यावर लादलेली बंधने, होत असलेली प्रताडणा थांबविण्यासाठी संविधानातून तीला दिलेले समान अधिकार, विशेष सवलती यासोबतच २७ सप्टेंबर १९५१
हिंदू कोड बिल च्या माध्यमातून स्रीयांना कायद्याच्या माध्यमातून दिलेले अधिकार व संरक्षण तसेच त्यांच्या हक्काकरीता भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून दिलेला पदाचा राजीनामा. एक सर्वसामान्य व्यक्ती हे करू शकत नाही तर डॉ बाबासाहेब आंबेडकर सारखे प्रज्ञावंत ज्यांच्यात समाजातील तळागाळातील शोषितांविषयी कळवळा आहे तेच हे करू शकतात..!
जीवनात एक ध्यास घेवून जगत असलेले डॉ बाबासाहेब यांनी कुटुंबातील दारीद्र व गरिबीमुळे औषधोपचाराविना
त्यांची चार मुलांचे व पत्नी रमाई त्यांच्या मृत्युला जवळून बघितले.  परंतू कुटुबांपेक्षा त्यांनी समाजाच्या प्रश्नांना  प्रथम प्राधान्य दिले. गुलामाला गुलामीची जाणीव करून देत विविध क्षेत्रात भरीव असे कार्य केले ज्यामुळे जगभरात भारताला आज गौरवशाली महत्त्व प्राप्त झालेले आहे. जगभरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना यांच्या अफाट ज्ञानामुळे जागतिक ज्ञानाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते, तसेच विविध देशात त्यांचे साहित्य विचार व त्यांचे पुतळे उभारून त्यांचा सन्मान केला जातो आहे. आजही कोणत्याही समतेच्या लढ्याला पुर्णत्वास नेण्याकरीता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशिवाय पर्याय दिसून येत नाही. भारतातील असे एकही क्षेत्र नाही ज्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व योगदान नसेल. या क्रांतीकारी महामानवाने रक्ताचा एक थेंबही न सांडवता जीवनाच्या अखेरच्या काळात लाखो अनुयायासोबत  बुध्दाचा विज्ञानवादी धम्म स्वीकारला. त्यांनी बुध्द आणि त्याचा धम्म हे अखेरचे लिहलेले पुस्तकं.
परंतू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे प्रज्ञासुर्य भारताच्या भुमित  जातीय व्यवस्थेमुळे उपक्षेतिच राहीले.  अजुनही त्यांच्याकडे जातीय चश्यातुन बघण्याची सवय गेलेली नसून देशाच्या आर्थिक, सामाजिक, राजिकिय, शैक्षणिक धार्मिक यासारख्या विविध क्षेत्रात भरीव कार्य करणा-या व समाजातील प्रत्येक वर्गाला न्याय देणा-या या महामानवाच्या विचारांना डोळसपणे स्विकारून मानवतेच्या दृष्टीने त्यांच्या विचारांना  या देशाला स्विकारण्याची आज गरज आहे. हीच खरी त्यांना व त्यांच्या कार्याला आदरांजली ठरेल.

जयभीम 🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here