कॉलेज कट्टा न्यूज ब्युरो
मुंबई-राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेतील अर्धा तास चर्चेतून बल्लारपूर येथे १५० कोटींचे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारण्याची आग्रही मागणी सभागृहात मांडली. बल्लारपूरच्या सागवान लाकडाचे ऐतिहासिक व राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित करत त्यांनी या प्रकल्पाची आवश्यकता स्पष्ट केली.‘राम-लक्ष्मण’ नावाने ओळखले जाणारे ऐतिहासिक लाकूड, भामरागड परिसरातील जीवाश्म, लाकडाच्या ३२ दुर्मिळ प्रजाती तसेच वनसंवर्धन, हवामान बदल आणि पर्यावरण शिक्षणाशी संबंधित माहितीचे जतन या म्युझियममध्ये करण्यात येणार असून, हे जागतिक दर्जाचे ज्ञानकेंद्र उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
या मागणीची दखल घेत वनमंत्री गणेश नाईक यांनी येत्या अर्थसंकल्पात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे ठाम आश्वासन दिले. या प्रकल्पामुळे बल्लारपूरच्या वनसंपदेची नवी ओळख निर्माण होऊन जागतिक पर्यटन, संशोधन व शिक्षण क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. महाराष्ट्रातील एकमेव टिंबर म्युझियम म्हणून हे केंद्र उभे राहत स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.




