कॉलेज कट्टा न्यूज-
बल्लारपूर-प्रजासत्ताक दिनानिमित्त विसापूर येथील सैनिक स्कूल येथे आयोजित कार्यक्रमात आ.सुधीर मुनगंटीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रजासत्ताक दिना निमित्त झालेल्या भव्य परेडमध्ये अनेक अधिकारी, शिक्षक व विद्यार्थी बंधू-भगिनींना त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
प्रजासत्ताक दिवस हा केवळ उत्सवाचा नाही, तर हजारो शहिदांच्या बलिदानातून जन्मलेल्या स्वातंत्र्याच्या आठवणी जागवणारा संकल्पाचा दिवस आहे. तिरंगा ध्वजाच्या आन-बान-शानसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करण्याची प्रेरणा हा दिवस देतो. मातृभूमीच्या सेवेसाठी सज्ज राहण्याचा संकल्प प्रत्येकाने आजच्या दिवशी करावा, हीच खरी देशभक्ती असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले.
“चंद्रपूरची भूमी ही शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणादायी साक्ष देणारी आहे. भारत-चीन युद्धकाळात देशासाठी सुवर्णदानात चंद्रपूरने देशात आघाडी घेतली, ही या भूमीची देशप्रेमाची ओळख आहे. 1942 च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात देशात सर्वप्रथम चंद्रपूरच्या चिमूर भूमीवर युनियन जॅक खाली उतरवून तिरंगा फडकविण्यात आला, हा इतिहास आजही अभिमानाने आठवतो. अशा पवित्र भूमीत उभ्या असलेल्या सैनिक स्कूलमधून देशसेवेसाठी सज्ज, शिस्तबद्ध व मूल्यनिष्ठ नेतृत्व घडत आहे. येथील विद्यार्थी हेच उद्याचे कर्तृत्ववान सैनिक, अधिकारी व राष्ट्रघडणीचे शिल्पकार ठरतील,या विश्वासाने मन अभिमानाने भरून येते..” असे भावनिक भाषण त्यांनी यावेळी केले.
“ना पूछो ज़माने को क्या हमारी कहानी है, हमारी पहचान तो बस इतनी है कि हम हिन्दुस्तानी हैं।” या ओळी म्हणत आ.मुनगंटीवारांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.




