विज्ञान दिवसाच्या निमित्ताने…….. वैज्ञानिक नाही तर किमान विज्ञानवादी बनूया.

0
69

 

भारतभर आज आपण विज्ञान दिवस साजरा करीत आहोत. मनुष्याचे संपूर्ण जीवन वैज्ञानिक विकासावर अवलंबून असलेले दिसते. जगाची लोकसंख्या आठ अब्ज च्या वर झालेली आहे, आणि भारताची एक अब्ज ५० कोटीच्या आसपास. या सर्व लोकांना खायला पोटभर अन्न द्यायचं असेल आणि प्यायला शुद्ध पाणी द्यायचं असेल तर विज्ञानाची कास आम्हाला धरावीच लागेल. भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी धरणे आणि कारखान्यांना आधुनिक मंदिर असे संबोधले होते. आधुनिक भारत हा विज्ञानाच्या वाटेवरच चालेल, हे निश्चित करण्यासाठी भारतातील लोकांनी आणि प्रशासनाने सुद्धा विज्ञानाच्या वाटेवर चालावे यासाठी संविधानातच वैज्ञानिक दृष्टिकोनाची तरतूद करून ठेवलेली आहे. संविधानातील आर्टिकल ५१ अ (ह ) असे म्हणते कि, It is the duty of every citizen “to develop the scientific temper, humanism and the spirit of inquiry and reform”.

भारत हा जगाचा २.४ टक्के भूभाग आहे परंतु या लहानशा भागात जगाची १८% लोकसंख्या निवास करते. या प्रचंड मोठ्या लोकसंख्येचे भरण-पोषण करण्यासाठी शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन काढावे लागणार आहे, पिकांवरची औषधे, कीटकनाशके, रासायनिक खते या शेतीच्या प्राथमिक गरजा विज्ञानाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. परंतु आत्ता आपल्याला इथेच थांबता येणार नाही. आधुनिक काळातील शेतीच्या गरजा संशोधनाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. पिकांच्या पारंपारिक वाणांतून आम्ही उत्पादन पूर्ण घेऊ शकत नाही, म्हणूनच उच्च जातीची बियाणे प्रयोग शाळेतच आम्हाला तयार करावी लागणार आहेत. हायब्रीड बियांना मागे सोडून आत्ता आम्ही जेनेटिक मॉडिफाइड (GM Crops) बियाणांपर्यंत प्रवास केलेला आहे. मृदा परीक्षण, पिकांची वैज्ञानिक पद्धतीने लागवड, ग्रीन हाऊस, याही गोष्टी विज्ञानावरच आधारित असणार आहेत. आणि या सर्व गोष्टींची शेतकऱ्यांना पुरेपूर माहिती व्हावी यासाठी रेडिओ आणि टेलिव्हिजन सारखे दूरसंचार साधने अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. या सगळ्यांचे मदतीनेच आम्ही पहिली हरितक्रांती भारतात करू शकलो आहोत. एक काळात अमेरिकेचा मिलो आम्ही आयात केला होता, हा मीलो अमेरिकेत जनावरांना चालण्यासाठी तयार केला जात होता परंतु अन्नधान्याच्या संदर्भात आता आम्ही स्वयंपूर्ण झालो आहोत. स्वातंत्र्याच्या सुमारास भारतात जवळपास ४३ लाख लोक उपासमारीमुळे मरण पावले होते. आज अन्न वस्त्र आणि निवारा या सर्व सोयी लोकांच्या पूर्ण होताना दिसत आहेत.

आजही (Indian agriculture is a gamble on Monsoon) भारतीय शेती आम्ही मोसमावरचे जुगार आहे असे म्हणतो, हा जुगार हरला की शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा उपाय राहत नाही. नॅशनल क्राइम रेकॉर्ड च्या अनुसार दुर्दैवाने सर्वात जास्त आत्महत्या (६०,०००) या प्रगतशील महाराष्ट्रातच झालेल्या आपणास पहावयास मिळतात. मोसमा वरचा हा जुगार जर आम्हाला जिंकायचा असेल तर विज्ञानच आम्हाला मदत करणार आहे. इंद्र देवाची पूजा करून, किंवा बेडकांचे लग्न करून पाऊस पडणार नाही, किंवा एखाद्या शेतातील देवाला बकरा कापून आम्ही शेतीतील दोष दुर करू शकणार नाही, याची आम्हाला पूर्ण माहिती आहे. पाऊस पडेल की नाही? यावर्षीचा पाऊस कसा असेल? मान्सूनची टक्केवारी किती असेल? यावर्षी अल नीनो किंवा ला नीना असेल काय? या सर्व गोष्टींची उत्तर आत्ता हवामानशास्त्राच्या सखोल अभ्यासातून मिळू लागलेली आहेत. सुदैवाने भारताने या क्षेत्रात आणी अवकाश संशोधन क्षेत्रात प्रचंड मोठी आघाडी घेतली आहे. सध्याच्या केंद्र सरकारने भारताचे उपग्रहीय तंत्रज्ञान दक्षिण आशियातील इतर मित्र देशांना सुद्धा देऊ केले आहे. हे देश सुद्धा भारतासारखे शेतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. ‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’ हे ब्रीद वाक्य भारताने स्वीकारले आहे.

एकूणच विज्ञानाशिवाय आजचा आधुनिक माणूस जगू शकत नाही, तुमच्या हातात असलेला मोबाईल, त्याला मिळालेले फाईव्ह जी नेटवर्क, अमेरिकेपासून सेकंदात तुमच्यापर्यंत येणारी माहिती हा सर्व नवीन तंत्रज्ञानाचा परिणाम आहे. मागील २५ वर्ष कम्प्युटर आणि इंटरनेटचे होते पुढचे पंचवीस वर्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्स ची राहणार आहेत. जीवनाच्या प्रत्येकच क्षेत्रात AI आत्ता प्रवेश करणार आहे. सरकारने सुद्धा याकडे लक्ष दिले पाहिजे, संशोधनावर आम्ही जीडीपीच्या ०.६ टक्के एवढाच खर्च करतो. ही टक्केवारी वाढवावी लागेल, तरच आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या विकास करू शकतो. या आधुनिक सर्वच गोष्टी लोकांना आणि विशेषतः राज्यकर्त्यांना समजावूनच घ्याव्या लागतील. विज्ञानातील प्रगतीमुळे जुन्या काही गोष्टी सुटतील, मागे पडतील, नवनवीन गोष्टी आम्हाला स्वीकाराव्या लागतील. जे लोक, कंपन्या, देश आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार नाहीत त्यांचा ‘नोकिया’ होऊ शकेल, म्हणूनच पुढे जाऊया आणि आधुनिक तंत्रज्ञान विज्ञान स्वीकारू या. वैज्ञानिक नाही तर किमान विज्ञानवादी बनूया.

डॉ. योगेश दुधपचारे,
चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here