कॉलेज कट्टा न्यूज-
चंद्रपूर-सत्ता असो,नसो,मंत्रिपद असो,नसो आपल्या अभ्यासपूर्ण शैली,वर्तमान स्थितीचा आढावा आणी भविष्यातील अचूक वेध यामुळे बऱ्याच वेळी विरोधकही त्यांच्या रास्त मागणीच्या सुरात सूर मिसळत मागणीला पाठींबा देतात.त्यांचा संघर्ष आणी आक्रमक पणा कुण्या व्यक्तिगत स्वार्था साठी नसतोच तो असतो राज्यातील शोषित,पीडित,कामगार कष्टकरी,दलित आदिवासी बांधवाच्या न्याय हक्कासाठी..!
त्याच उच्च विद्या विभुषित नेत्याचं नाव म्हणजे सुधीर मुनगंटीवार…
जनतेच्या न्याय हक्कासाठी सातत्यपूर्ण संघर्ष-
महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन सुरू झाले की, सभागृहात काही आवाज विशेष ठसठशीतपणे उमटतात. त्यापैकी एक ठाम, अभ्यासू आणि प्रभावी आवाज म्हणजे बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार. जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी लक्षवेधी सूचना, अशासकीय ठराव, चर्चा आणि पूरक प्रश्न यांसारख्या संसदीय आयुधांचा अत्यंत कल्पकतेने वापर करत राज्य सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे. एखादा अनुभवी नायक चित्रपटात जसा संघर्षातून सामान्यांना न्याय मिळवून देतो, तशीच काहीशी भूमिका आ. मुनगंटीवार सभागृहात बजावताना दिसतात.
स्थानिक रोजगार आणि कामगार सुरक्षा-
चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक प्रकल्पांमध्ये स्थानिक युवकांना ८० टक्के रोजगार मिळावा, ही मागणी आ.सुधीर मुनगंटीवार यांनी अत्यंत आक्रमकपणे लावून धरली. त्यांच्या या पाठपुराव्याची दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चंद्रपूरमध्ये ‘एमआईडीसीमध्ये कौशल्य विकास केंद्र’ उभारण्याचे आणि रोजगार धोरणाचा आढावा घेण्याचे आश्वासन दिले. केवळ रोजगारच नव्हे, तर कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्नही त्यांनी तितक्याच ताकदीने मांडला. कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कारखान्यातील अपघाताच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लक्षवेधी सूचना मांडली. सल्फ्युरिक ॲसिड टँकर लोडिंग दरम्यान जखमी झालेल्या अक्षय कन्नाके आणि स्वाती उईके या कामगारांना किमान २५ लाख रुपयांची मदत मिळावी, अशी मागणी आ . सुधीर मुनगंटीवार यांनी केली. यावर कामगार मंत्र्यांनी संबंधित कंपनीला जास्तीत जास्त मदत देण्याचे निर्देश दिले. तसेच, कामगार सुरक्षा कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी आमदारांचा अभ्यासगट स्थापन करण्याचे आणि चंद्रपूरमध्ये अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेण्याचे आश्वासनही सरकारला द्यावे लागले.
बल्लारपूर येथे उभारण्यात येणाऱ्या ‘टिम्बर- म्युझियम-झायलरियम’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आ.सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात प्रभावी मांडणी केली. वनसंपदेचा इतिहास, लाकूड उद्योगाचे विज्ञान आणि पर्यावरणीय जागरूकता यांचे दर्शन घडवणारे हे संग्रहालय जिल्ह्यासाठी किती आवश्यक आहे, हे त्यांनी पटवून दिले. याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात या प्रकल्पाची घोषणा केली. या उपक्रमामुळे चंद्रपूर जिल्ह्याला पर्यटन आणि संशोधनाच्या क्षेत्रात जागतिक ओळख मिळणार आहे.
नव्या पिढीसाठी आदर्श कार्यशैली-
विधानसभेत एखादा मुद्दा कसा मांडायचा, त्याची मांडणी कशी असावी आणि त्यातून सरकारकडून ठोस निर्णय कसा पदरात पाडून घ्यायचा, याचे उत्तम कौशल्य आ.सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आहे. म्हणूनच अनेक तरुण आमदार त्यांना आपला आदर्श मानतात. सत्तेच्या राजकारणात न रमता, संसदीय प्रक्रियेला जनसेवेचे शस्त्र बनवणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख अधिक गडद झाली आहे. अनुभव, व्यासंग आणि संसदीय परंपरांची जाण यांचा त्रिवेणी संगम असलेल्या आ.मुनगंटीवार यांच्या शैलीमुळेच विधानसभेचे मैदान आजही त्यांच्या अभ्यासू मांडणीने गाजताना दिसते.




