छकुली सरिता बालाजी कोटरंगे
मो. न.:7499085499
६ डिसेंबर १९५६ हा दिवस संपूर्ण भारतीय जनतेसाठी अत्यंत दुःखाचा दिवस आहे . या दिवशी भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या समाजासाठी अनमोल कार्य करून हे जग सोडून गेले. त्यांचे कार्य अतुलनीय आहे.
बाबासाहेब आज जरी आपल्यात नसले तरी, त्यांचे विचार आजही आपल्याला सत्याच्या मार्गावर जाण्याची शिकवण देतात. आधुनिक काळात मानवाच्या दैनंदिन आयुष्यात बाबासाहेबांची शिकवण आपल्या अंगी अवगत करण्याची काळाची गरज आहे.
बाबासाहेबांनी म्हटले आहे की, “बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष असले पाहिजे.” पण आजची स्थिती पाहता, या धावपळीच्या युगात प्रत्येक जण आपली कामे दुसऱ्यांच्या साहाय्याने करू पाहतो आहे. एखादे कार्यालयीन कामकाज असेल तर, पैसे देऊन ते एखाद्या कर्मचाऱ्यांकडून लवकरात लवकर करून घेतात . समोरचा आपल्याला किती लुबाडतो आहे, याची त्याला अजिबात पर्वा नसते. माणूस आपल्या छोट्या – छोट्या गोष्टींसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहतो. असे केल्यामुळे त्याच्यात आळशी प्रवृत्ती वाढते.
” ज्याला दुःखातून सुखा पाहिजे असले त्याला लढावे लागेल, आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल, कारण ज्ञानाशिवाय लढलात, तर पराभव निश्चित आहे.” असे बाबासाहेब नेहमी म्हणायचे.
आजच्या तरूण वयातील मुले बिघडलेली दिसतात. त्याच्यांत गुण असतात, पण त्या गुणांना दिशा देणारे शिक्षण त्यांच्याजवळ नसते. म्हणून ते वेसनाच्या आहारी जावून, स्वःताचे आयुष्य नरकात ढकलतात. बाबासाहेबांनी एकदा म्हटले आहे,” शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.”
या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी म्हणतात, मला भविष्यात हे करायचे, मला ते व्हायचे आहे. पण मी वर्तमान स्थितीत काय केलं पाहिजे, हे त्यांना माहित नसतं. ते दिशा भरकटतात. ते फक्त प्रयत्न करतात, योग्य प्रयत्न करीत नाही. व यशाच्या वाटेवर चालतांना ते स्वःताच्या स्वप्नापर्यंत पोहचू शकत नाही . या गोष्टीचे समाधान बाबासाहेबांनी आधीच सांगून ठेवले आहे. पण आजचे विद्यार्थी ती गोष्ट अवगत करीत नाही. बाबासाहेबांनी म्हटले होते, तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्त्वाचे आहे.
धर्म, जात, वंश, भाषा, परंपरा इ. भेदभाव भारतात आजही आढळून येतात. जातीवाद संपलेला नाही. धर्माच्या नावाखाली आजही झगडे चालूच आहेत. पण खरा धर्म काय असतो? हे सांगतांना बाबासाहेब म्हणतात,” मला स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो.”
धर्मामुळे, जातीमुळे वाद तर होतातच शिवाय अंधश्रद्धा, माणसामाणसां मधील मतभेदही वाढीला लागतात. आज देशात जादूटोणा, बुवाबाजी, फसवेगिरी सुरू आहे. आणि महत्त्वाची शोकांतिका म्हणजे हि की, आता शिक्षित वर्गही अशा तुच्छ गोष्टींकडे वळतांना दिसतो आहे. समजूदारपणाचा पडदा झाकून लोक आपल्या लालसेपोटी असल्या तुच्छ प्रकारच्या गोष्टींमध्ये सहभागी होतात.
म्हणूनच बाबासाहेब प्रश्न विचारतात,” आकाशातील चंद्र तारे जर माझे भविष्य ठरवत असतील, तर माझ्या मेंदूचा आणि मनगयचा काय उपयोग?” या एका प्रश्नात चमत्कार, जादूटोणा ह्या किती विपरीत गोष्टी आहेत, याचा अंदाज आपल्याला येवू शकतो. म्हणूनच बाबासाहेब म्हणतात,” ह्या जगात स्वाभिमानाने जगायला शिका आपल्याला काहीतरी करून दाखवायचे आहे, अशी महत्वाकांक्षा सदैव असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात.”
बघा, अशाप्रकारे बाबासाहेबांची विचारसरणी किती अनमोल शिकवण देणारी आहे . ही शिकवण जर आजच्या जीवनमानात आपण अवलंबण्याचा निर्धार केला, तर माणूस किती चांगले व्यक्तित्व घडवू शकेल, याची आपण कल्पना करू शकतो .




