शेतकऱ्याचे किडनी विक्री प्रकरणाचे तार देश विदेशात…अनेक खुलासे होणार..?

0
79

कॉलेज कट्टा विशेष बातमी
चंद्रपूर- सावकारी कर्ज फेडण्यासाठी 8 लाखात शेतकऱ्याला किडनी विकावी लागल्याच्या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले असून,हे मानवी अवयव विक्रीचे हे गंभीर प्रकरण चंद्रपूरातून देशात आणी देशातून विदेशात पोहचले आहे…

सावकारी कर्जाची परतफेड करायला रोशन कुडे या शेतकऱ्याला किडनी विकावी लागल्याचे हे प्रकरण देशभर गाजत असतांना चंद्रपूर पोलिसांनी या प्रकरणाचे सज्ञान आणी गांभीर दखल घेऊन उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

किडनी विकायला प्रवृत्त करणारा कथीत डॉक्टर कृष्णा पोलिसांच्या ताब्यात-
रोशन कुडे हा शेतकरी कर्जाने बेजार झाला होता.फेसबूक पेजच्या माध्यमातून कृष्णा यांच्या संपर्कात आला. व्हॉट्सॲप चॅट आणि फोनच्या माध्यमातून हे दोघे संपर्कात होते. त्यानेच रोशनला किडनी विकण्याचा सल्ला दिला आणि मोबदल्यात आठ लाख मिळतील, असे सांगितले. रोशन कंबोडियाला जाण्यापूर्वी त्यांची पहिली भेट कोलकाता इथे झाल्याचे सांगितले जाते. आरोपी कृष्णा हा कपडा व्यवसायात अपयशी ठरला होता आणि त्यानेही आपली किडनी विकली, हे विशेष! तो डॉक्टर म्हणून वावरत असला तरी मुळात तो इंजिनिअर असल्याचे सांगितले जाते. पंजाब, हरियाणा, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यात हे रॅकेट सक्रिय असतानाच महाराष्ट्रात चंद्रपूर आणि नाशिकनंतर आता सोलापूरचे नाव समोर आले. त्यामुळे हे रॅकेट आणखी किती ठिकाणी पसरले आहे, याचा शोध पोलीस घेत असून, आरोपी कृष्णा हा कायद्याच्या दृष्ट्रिकोनातून महत्वपूर्ण पुरावा ठरणार आहे. दरम्यान, आरोपी कृष्णा ला रात्री उशिरा न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला तीन दिवसांची कोठडी देण्यात आली आहे.

आरोपीच्या अटकेमुळे अनेक प्रश्नांचे गूढ उलगडणार…
चंद्रपूर ते कम्बोडिया किडनी तस्कर रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. विशेष म्हणजे आरोपीने स्वत:चीही किडनी विकलीय. आतापर्यंत त्याने दहा जणांना किडनी विकण्यासाठी प्रवृत्त केलं. तो कम्बोडियाला पाठवायचा हे सगळं करण्यासाठी त्याला कमिशन मिळत असल्याचं समोर आलं आहे.
किडनी विक्रीप्रकरणी पोलिसांना तपासात मोठे यश मिळाले आहे. ज्याच्या माध्यमातून रोशन कुडे या शेतकऱ्याने कंबोडियात किडनी विकली. तो डॉ. कृष्णा पोलिसांच्या हाती लागला आहे. कृष्णा हे नाव धारण करून तो सोलापुरात वास्तव्यास होता. त्याला तिथून पकडण्यात आले आहे. त्याचे मूळ नाव रामकृष्ण मल्लेशम सुंचू आहे. याला एका किडनीसाठी एक लाख रुपयांचे कमिशन मिळायचे. त्यामुळे तो गरजूंना हेरून किडनी काढण्यासाठी प्रवृत्त करायचा. त्याच्या माध्यमातून जवळपास १२ जणांनी कंबोडियातील प्रेआ केत मेलीआ हॉस्पिटल, फ्नॉम पेन्ह, कंबोडिया (मिल्ट्री हॉस्पिटल) येथे किडनी विकल्याचे समोर आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक मुमक्का यांनी दिली आहे.

का विकावी लागली शेतकऱ्याला किडनी..?
शेतकरी रोशन कुडे यांना सततच्या नापीकीने संसाराचा गाडा हाकणे कठीण झाले होते.म्हणून दुग्ध व्यवसायातून थोडी मिळकत होईल,घराला आर्थिक हातभार लागेल म्हणून त्यांनी दुधाळ गाई खरेदी केल्यात. यासाठी त्यांनी दोन सावकाराकडून 50 50 हजार रुपये घेतले. येथेही त्यांना नशिबाने धोका दिला. खरेदी केलेल्या गाई मरण पावल्यात. त्यात शेतीही पिकेना. कर्जाचा डोंगर वाढत गेला. सावकार घरी येऊन नको ते बोलू लागलेत. कर्जातून मुक्त होण्यासाठी त्यांनी दोन एकर जागा विकली.ट्रकटर आणि घरातील सामान विकले.मात्र कर्ज काही संपेना. एक लाखाचे 74 लाखावर गेले. शेवटी कर्ज घेतलेल्या एका सावकाराने किडनी विकण्याचा सल्ला दिला. एका एजंटने रोशन कुडे यांना कलकत्ता येथे नेले. कुडे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर कंबोडिया येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि किडनी काढण्यात आली. ही किडनी कुडे यांनी आठ लाखाला विकली.

किडनी तस्कर रॅकेट देश- विदेशात सक्रिय..?
आरोपीच्या अटके नंतर अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविली जात असून,हे किडनी तस्कर रॅकेट देश- विदेशातही सक्रिय आहे का?या प्रश्नाचे उत्तर पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत आहे

सावकरांना ठोकल्या बेड्या
कर्जफेड करण्यासाठी किडनी विकावी लागल्याचा गंभीर आरोप शेतकरी रोशन कुडे यांनी केल्यावर पोलिसांनी हे प्रकरण युद्धपातळीवर तपासासाठी घेतले. या प्रकरणातील सर्व सहा आरोपी सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये किशोर बावनकुळे, मनीष घाटबांधे, लक्ष्मण उरकुडे, प्रदीप बावनकुळे, संजय बल्लारपूरे, सत्यवान बोरकर या सावकारांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here