कॉलेज कट्टा न्यूज
बल्लारपूर (नरेंद्र सोनारकर): सार्वत्रिक निवडणूक बल्लारपूर नगर परिषद “आम्हाला ज्यांनी मतदान केले त्यांचे आभार…ज्यांनी मतदान केले नाही त्यांचेही मनःपूर्वक आभार…पुढील पाच वर्षात आपल्या शहरात विकासाची गंगा वाहणार यात मुळीच दुमत नाही,शुभेच्छा…” अशा आशयाचा एक बोर्ड बल्लारपूर नगर पालिका,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने लावण्यात आल्याने अनेक तर्क वितर्क लावल्या जात आहे.
दिनांक 21 डिसेंबर रोजी पालिका निवडणुकीच्या निकालात भाजपचा अक्षरशः धुव्वा उडाला.अल्प मताने नगराध्यक्ष पदही गमवावे लागले.जिल्यातही भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला… या पार्श्वभूमीवर भाजप अंतर्गत वाद उभाळून आला.राज्यभर याचे पडसाद उमटले.आ.सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक पवित्रा घेत आपल्याला शक्तिहीन करण्याचा प्रयत्न होत असल्याचे पक्षश्रेष्ठीच्या लक्षात आणून दिले. मात्र माजी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर,आ.किशोर जोरगेवार,मंत्री बावनकुळे यांनी अपयशाचे खापर मुनगंटीवार यांच्यावरच फोडत त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला.या संदर्भाने राज्यात भाजप अंतर्गत वातावरण तापले असतांनाच शहरात लावण्यात आलेल्या बोर्डाचा नेमका आशय काय? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
जिल्ह्यात बहुतांशी भाजप चे आमदार आहेत.केंद्र आणी राज्यात भाजप सत्ताधारी प्रमुख पक्ष आहे.असे असतांना “ज्यांनी मतदान केले नाही त्यांचेही मनःपूर्वक आभार मानत काँग्रेसच्या ताब्यात गेलेल्या या बल्लारपूर नगर परिषेत “पुढील पाच वर्षात विकासाची गंगा वाहणार यात मुळीच दुमत नाही” या शुभेच्छा उपरोधक आहेत की कुणाला डिवचण्यासाठी आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आजवर कोणत्याही राजकीय पक्षाने ‘ज्यांनी मतदान केले नाही त्यांचे मनःपूर्वक आभार’ मानले नाही.त्यामुळे या बोर्ड मधून व्यक्त करण्यात आलेल्या विविधार्थी शुभेच्छांचा नेमका अर्थ काय..?यांचे उत्तर शोधण्याचा प्रत्येक नागरिक आपापल्या परीने प्रयत्न करत आहे,हे विशेष उल्लेखनीय आहे!




