कॉलेज कट्टा न्यूज
बल्लारपूर- शहराला लागून आलेल्या विसापुरात एक भयंकर घटना उघडकीस आली असून,
दारू पिऊन घरात सतत कलह निर्माण करणाऱ्या दारूच्या व्यसनाधीन झालेल्या आपल्याच मुलाला संपवल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गणेश विश्वनाथ भोयर (25)असे मृतकाचे नाव असून त्याचा निघृण खून करून त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकून देण्यात आला होता.सुरुवातीला ही घटना रेल्वे अपघात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.मात्र पोलिसांनी बारकाईने घटनास्थळाची सखोल पाहणी केली.दरम्यान हे प्रकरण अपघाताचे नसून घातपाताचे असल्याचा संशय पोलिसांना आला.आणी तपासात अविश्वसनीय बाब समोर आली. या जघन्य गुन्ह्यात गणेशचे स्वतःचे आई-वडील व सख्खा भाऊच सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलीस तपासानुसार मृतक गणेश भोयर हा दीर्घकाळापासून बेरोजगार होता. त्याला दारूचे व्यसन असल्याने घरामध्ये वारंवार वाद होत असत. हा कौटुंबिक वाद कालांतराने टोकाला गेला आणि त्याचे रूपांतर हिंसाचारात झाले. याच वादातून आई-वडील व भावाने संगनमत करून गणेशचा खून केल्याचा तपासणीत उघड झाले. गुन्हा अपघातासारखा भासावा, यासाठी त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर नेऊन टाकण्यात आला.
रेल्वे रुळावर युवकाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्रथमदर्शनी रेल्वे अपघाताची शक्यता व्यक्त करण्यात आली होती; मात्र घटनास्थळावरील संशयास्पद बाबीमुळे पोलिसांना संशय बळावला. त्यानंतर कुटुंबीयांची कसून चौकशी करण्यात आली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
या प्रकरणी पोलिसांनी मृतकाचे वडील विश्वनाथ भोयर (७०), आई कौशल्या विश्वनाथ भोयर (वय ५५) तसेच भाऊ गुरुदास विश्वनाथ भोयर (वय २८) यांना अटक केली आहे.
सदर संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड व त्यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि बारकाईने केलेल्या तपासामुळे अल्पावधीतच या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आले आहे.




