कॉलेज कट्टा न्यूज-
बल्लारपूर प्रतिनिधी- महात्मा गांधी यांच्या हुतात्मा दिनी (३० जानेवारी) रोजी महाराष्ट्र शासनाने घोषित केलेली महापौर निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्याची मागणी राष्ट्रीय काँग्रेस ने राज्यपालांना उपविभागीय अधिकाऱ्या मार्फत पाठवलेल्या निवेदनातून केली होती. त्याची तात्काळ दखल घेत चंद्रपूर महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.
३० जानेवारी हा राष्ट्रपिता महात्मा गांधींचा स्मृतिदिन असून, हा हुतात्मा दिवस भारतच नाही तर संपूर्ण विश्व, शांतीदूत महात्मा गांधी यांच्या पावन स्मृतींना स्मरण करत त्यांच्या त्याग आणी बलिदानाची आठवण करून शोकमग्न होतो. नेमका तोच दिवस म्हणजे ३० जानेवारी रोजी महापालिकांच्या महापौर पदाची निवडणूक घोषित केल्या गेल्याने महात्मा गांधी यांच्या विचारांना मानणाऱ्या करोडो भारतीयांना दुःखद धक्का बसला असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले होते. याच हुतात्मा दिवशी महापौर पदाची निवडणूक संपन्न झाल्यास विजयी उमेदवारांचे समर्थक ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळत, आतिषबाजी आणी विविध पद्धतीने हा विजय साजरा करतील.हा मोठा विपर्यास नाही का..? असा प्रश्न निवेदनातून उपस्थित करण्यात आला होता.
दरम्यान या निवेदनाची दखल घेत शासनाने चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर या पदांच्या निवडणुकीकरीता १० फेब्रुवारी २०२६ ही तारीख निश्चित केली असून,सकाळी ११ वाजता राणी हिराई सभागृह, चंद्रपूर महानगरपालिका, चंद्रपूर येथे विशेष सभेचे आयोजन करून ही निवडणूक पार पडणार आहे.




