कॉलेज कट्टा न्यूज
चंद्रपूर (प्रतिनिधी): रेल्वेत टीसी ची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 15 बेरोजगार तरुणांची आर्थिक व मानसिक फसवणूक प्रकरणी रामनगर पोलीस ठाणे व EOW कडून गुन्हा दाखल करून सखोल तपास सुरु….
काय आहे नेमकं प्रकरण?
रेल्वेत टीसी (टिकिट कलेक्टर) नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 15 बेरोजगार तरुणांकडून सुमारे 1 कोटी 31 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
चंद्रपूर येथील रहमत नगरचा मुजिबुर लतीफ कुरेशी, सिस्टर कॉलनीतील रविंद्र संभाजी वाघमारे आणि नागपूरचा गोधनी येथील सुरेंद्र रामकृष्ण तेलंग असे या प्रकरणातील आरोपींची नावे असून, हे प्रकरण प्रथम 6 फेब्रुवारी 2026 रोजी उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांनी हालचाल करत आरोपी विरोधात अधिकृत FIR नोंदवली.
गुरुवार, 19 फेब्रुवारी 2026 रोजी फिर्यादी कौस्तुभ विलास आदे यांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406, 465, 464, 468, 471, 472, 473 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा तपास रामनगर पोलीस ठाण्याचे PSI सुरेंद्र उपरे करीत असून आर्थिक गुन्हे शाखा (EOW), चंद्रपूरही समांतर तपास करत आहे.
घर-शेती गहाण/कर्ज बाजारी होऊन आरोपींना दिली रकम-
आरोपींनी सरकारी नोकरीची इच्छा असलेल्या तरुणांना रेल्वेत टीसी पदावर नियुक्तीचे आमिष दाखवले. प्रत्येकाकडून 10 ते 15 लाख रुपये रोख उकळले. अनेकांनी घर व शेती गहाण ठेवली, कर्ज घेतले आणि नातेवाईकांकडून पैसे उधार घेतले.मात्र रोख रकम घेतल्यानंतर तरुणांना बनावट नियुक्ती आदेश, मेडिकल सर्टिफिकेट, ट्रेनिंग प्रमाणपत्र, पोलिस व्हेरिफिकेशन आणि ओळखपत्र देण्यात आले.मात्र हा बोगस प्रकार लक्षात आल्यावर दिलेली रकम परत मागितल्यावर आरोपींनी टाळाटाळ करणे सुरु केले. पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचेही आरोप आहेत.
असा रचला गेला फसवणुकीचा कट!
2014 मध्ये शबनम शेख नावाच्या महिलेने तरुणांची आरोपींशी ओळख करून दिली. कुरेशी रेल्वेत थेट भरती करून देतो व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचा दावा करत “100 टक्के खात्री” दिली गेली. त्यावर विश्वास ठेवून मोठी रक्कम देण्यात आली.दरम्यान नागपूर ते कोलकाता ‘ट्रेनिंग’चा बनाव करून तरुणांना आधी चंद्रपूर, नंतर नागपूर आणि विमानाने कोलकाताला नेण्यात आले. तिथे हॉटेलमध्ये ठेवून कथित “टीसी ट्रेनिंग स्कूल” दाखवण्यात आले. बनावट प्रशिक्षण देऊन नकली प्रमाणपत्रे व पोलिस सत्यापन पत्र देण्यात आले. जवळपास दीड वर्ष आश्वासने देत आरोपी संपर्क कमी करत गेले आणि फसवणूक उघड झाली.
यातील मुख्य आरोपीने यापूर्वीही केली फसवणूक?
मुख्य आरोपी पूर्वी नांदेड कारागृहात होता, असेही तक्रारीत नमूद आहे. सुटकेनंतर कार्यालये बदलून वेळ मारून नेली. दबाव वाढल्यावर दिलेले चेक बाउंस झाले. प्लॉट विक्रीच्या नावाखाली 7–8 वर्षे पैसे परत न देता टोलवाटोलवी केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.दस्तावेजी पुरावे म्हणून पोलिस आणी EOW कडे सादर कागदपत्रांमध्ये बनावट नियुक्ती आदेश, ट्रेनिंग सर्टिफिकेट, पोलिस व्हेरिफिकेशन पत्र आणि बाउंस चेकचा समावेश आहे. पोलिसांकडून यांची तांत्रिक तपासणी सुरू आहे.
कोण आहेत बळी पडलेले तरुण?
फसवणुकीतील पीडित तरुण
चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ आदी भागातील 15 युवक यात बळी ठरले आहेत. त्यात पवन वाघमारे, कौस्तुभ आदे, इकराम शेख, हरीश अकुला, गोपाल मुंडले, विपिन गणवीर, दिनेश अंड्रस्कर, अशोक सातपुते, रविंद्र वांढरे, शेख सय्यद, नागराज अंबाला, अनुप शेंडे, हरिहर मेश्राम, गंगाधर पेंडयाला आणि इमरान पठाण यांचा समावेश आहे.
फक्त फसवणूक नव्हे,डिजिटलं इंडिया ला आव्हान!
ही घटना केवळ गुन्हेगारी नसून बेरोजगार तरुणांच्या असहाय हटबलतेचे प्रतीक बनली आहे. बनावट नियुक्ती पत्रे तयार होणे आणि आरोपी वर्षानुवर्षे मोकाट राहणे यामुळे प्रशासकीय यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
काय आहे पीडितांची मागणी?
मुख्य आरोपी मुजिबुर कुरेशीसह सर्व आरोपींना तात्काळ अटक, संपूर्ण रकमेची वसुली आणि या रॅकेटमधील इतर दलालांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी पीडितांनी केली आहे.हा गुन्हा केवळ एक FIR नाही, तर बेरोजगार तरुणांच्या उद्ध्वस्त स्वप्नांची कहाणी असून निष्पक्ष व तंत्रशुद्ध तपास होऊन तरुणांची रोख रकम आरोपी कडून वसूल करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी पीडितांची मागणी आहे.




