- पैसाच महत्वाचा असेल तर कार्यकर्त्यांनी राबायचं कशासाठी,कुणासाठी..?
चंद्रपूर (नरेंद्र सोनारकर):अलीकडे पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी अक्षरशः पैशाचा पाऊस पडला…पाचशे ते दोन हजार रुपया पर्यंत मतांची किमत ठरवली गेल्याची विश्वासनीय माहिती आहे.कार्यकर्त्यांनी अनेक वर्ष राबराब राबून जनसेवेत स्वतःला झोकून दिले असले तरी अनेक राजकीय पक्ष त्याची आर्थिक पार्श्वभूमी बघूनच पक्षांच्या तिकिटा देतात.म्हणजे राबणाऱ्या कार्यकर्त्याने फक्त काम करायचे आणी त्या कामाचा मोबदला म्हणून त्याने पक्षाला तिकिट मागितली तर ऐन वेळेवर आर्थिक संपन्न असलेल्याना उमेदवारी द्यायची.अशा प्रकारा मुळे लोकशाही धोक्यात आली असून,ज्यांना सभागृहात जाऊन काय करायचे?हे माहित नसलेले ‘अनपढं गवार’ निव्वळ पैशाच्या जोरावर जनप्रतिनिधी म्हणून समाजाच्या उरावर लादले जातात.जनसेवेत राबणाऱ्या कार्यकर्त्याला पक्षाने तिकिट नाकारल्यास त्याने बंडखोरी करून निवडणूक लढवल्यास ज्यांच्यासाठी त्याने कामे केली,ज्यांच्यासाठी तो राबला तेही लोक त्याला मतदान करत नाहीत.उलट “पैसा नाही तर निवडणूक लढाईची कशाला?” हा बेशरम प्रश्न करून त्याला वेठबिगार ठरवले जाते…
२ डिसेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या निवडणुकीत अनेक ठिकाणी पैसा वाटल्या गेल्याच्या बातम्या येत आहेत.हे लोक का पैसा वाटतात…? कारण त्यांची कामे शून्य असतात.अधिकाराने जनतेच्या न्यायालयात मत मागण्याची त्यांची लायकी नसते.तिकडे राबणारा कार्यकर्ता आपण केलेल्या कार्याच्या भरोशावर जनतेला मते मागतो.त्याची लायकी असतांना,समाज सेवेचा मोठा अनुभव आणी त्याग त्याच्या पाठीशी असतांनाही “निवडणुकीत पैसा लागतोच” ही निर्माण केल्या गेलेली सामाजिक मानसिकता त्या कार्यकर्त्याचा बळी घेऊन पैसेवाला उमेदवार निवडूण आणतो.निवडणूक लढण्यासाठी काम,कार्य,निष्ठा,जनसेवेची भावना,शिक्षण यातलं काही नसलं तरी पैसा असला तर हमखास निवडून येण्याची गॅरंटी असेल; किंबहुना तो उमेदवार राबणाऱ्या कार्यकर्त्या पेक्षा अधिक मते घेत असेल तर कार्यकर्त्यांनी आपल्या घरावर तुडशिपत्र ठेऊन राबायचे कुणासाठी,कशासाठी..? असा यक्ष प्रश्न प्रामाणिक कार्यकर्त्यांपूढे उभा ठाकला आहे…तर लाखो रुपये खर्चून निवडून येणार्या उमेदवारांना जनतेच्या पाणी,विज,सफाई,आरोग्य या समस्येशी त्यांचे काय घेणे देणे राहू शकेल..? त्यांनी खर्च केलेला पैसा कमिशनखोरी,ठेकेदारी किंवा अन्य मार्गाने वसूल केल्यास त्यांना दोष देता येईल का..? उमेदवार निवडतांना त्यांची लायकी न बघता निव्वड पैसा आहे म्हणून निवडून देणारे मतदार दोषी,की निवडणुकीत पैसा वाटणारे उमेदवार दोषी यावर मंथन होणे गरजेचे असले तरी मतदारांची बदलत चाललेली मानसिकता,राबणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून राजकीय पक्षांकडून ऐन वेळी आर्थिक संपन्न उमेदवाराला दिल्या जाणारी उमेदवारी हि कुप्रथा दिवसंदिवस समाज् मनात अधिक खोल खोल रुजत असेल तर कार्यकर्त्यांनी कुणासाठी आणी कशासाठी काम करावे…? हा प्रश्न एरणीवर येत असतांनाच निवडणुकीच्या आर्थिक सुब्बतेत लोकशाहीचे पाळीमुळे किती खिडखिडे होत आहे..?याला मी जबाबदार आहे का..,?यांचे उत्तर प्रत्येक मतदाराने स्वतःला विचारल्या शिवाय लोकशाही तग धरू शकणार नाही…




