कॉलेज कट्टा- बल्लारपूर
नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवारा विरूध्द प्रचार केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे श्री. देवेंद्र सत्यदेव आर्य यांना बल्लारपूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदावरून मुक्त करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ने एक अधिकृत पत्र (जावक क्र.८३५/२०२५)दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी कार्यालयीन आदेशा अंतर्गत जारी केले असून, त्यात देवेंद्र आर्य यांची बल्लारपूर शहर अध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.त्यामुळे रिक्त झालेल्या बल्लारपूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी श्री.अब्दुल करीम अब्दुल रहीम शेख यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचेही पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
यात विशेष बाब ही की काँग्रेसचे तत्कालीन जेष्ठ नेते घनशाम मुलचंदानी यांच्या सुनबाईला पक्षाने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी नाकारल्यावर त्यांनी ऐन वेळेवर शिवसेनेची मशाल हाती घेऊन पालिका नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उडी घेतली होती.याच पार्श्वभूमीवर काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष देवेंद्र आर्य यांनी ” पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना खपवून घेतले जाणार नाही” अशा आशयाचे प्रसिद्धी पत्रक काढून बंडखोरांना तंबी दिली होती.मात्र त्यांच्यावरच काँग्रेस उमेदवारांच्या विरुद्ध प्रचार केल्याचा ठपका ठेवत त्यांना पदमुक्त केल्याने राजकीय वर्तुळात आणी शहरात नवल व्यक्त केले जात आहे…




